सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

“जिच्या हाती पतंगाची दोरी..."



परवा आमच्या शाळेचा पतंग महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा झाला.
.
. पतंग महोत्सवाचं हे पाचवं वर्ष....
.
दरवर्षी यात आनंदाची आणि उत्साहाची भर पडतच आहे...
.
पतंग हातात घेऊन मागे बघत पळणारा एक विद्यार्थी अपघातात सापडता सापडता वाचल्यावर सुचलेला हा उपक्रम...
.
पतंग कसा उडवावा हे मुलांना कळावं आणि या खेळाचा त्यांना मनमुराद आनंद घेता यावा या एकमेव उद्देशाने सुरू केलेल्या या महोत्सवाने आणखी बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या.
.
दुसऱ्या वर्षापासून विकतचे पतंग घेता स्वतः  बनवण्याच्या निर्णयाने कार्यानुभवी उपक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या कल्पनांनीही भरारी घेतली.
.
पतंगत्याचा मांजा, मांज्याचं पतंगाला असणारं बंधन, मात्र त्याचा आधार सुटल्यावर पतंगाचं भरकटणं, या सगळ्याचा संबंध शिस्तीशी, नियमांशी, मोठ्या माणसांशी जोडला गेला तेव्हा हजार शब्दांचं काम या उपक्रमातून साधलं....
.
.
आणखी एक विलक्षण परिणाम यातून साधून गेला.
.
पहिल्याच वर्षी प्रार्थनेच्या वेळी महोत्सवाची घोषणा केल्यानंतर थोड्या वेळाने मुली भेटायला आल्या.
सरआम्हीपण भाग घ्यायचा का पतंग महोत्सवात?”
.
त्यांचा हा भाबडा प्रश्न एकदम अनपेक्षित तर होताच पण त्यासोबत प्रस्थापित परंपरेला हलवणाराही होता.
.
२१ व्या शतकाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या बरोबरीने स्वतः च्या क्षमता सिद्ध करत आहेतखेळापासून सैन्यापर्यंत देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत, त्याच देशातील एका छोट्याश्या खेड्यातल्या मुली विचारत होत्या,
सरआम्ही पण भाग घ्यायचा का पतंग महोत्सवात?”
.

सृष्टीच्या निरंतर चक्राची गती खुद्द निसर्गानेच जिच्या हाती दिलेय, त्या उद्याच्या स्त्रिया आमच्यासमोर उभ्या होत्या. पतंगासारख्या खेळामध्येही असणाऱ्या पुरूषी रूढी - परंपरांचा जणू घट्ट मांजाच त्यांच्या पायामध्ये गुंतला होता. मात्र यातून आपले पाय अलगद सोडवून घेण्याची त्यांची धडपड आणि उमेद वाखाणण्याजोगी होती.
.
 आणि या प्रयत्नात त्या कोवळ्या जीवांना आमची साथ हवी होती....
.
.
.
आम्ही दिली....
.
.
आज सलग पाचव्या वर्षी मुलांशी स्पर्धा करत जोशाने पतंग उडवणाऱ्या  मुलींना बघून वाटतं...
.
.
यांच्या स्वप्नांनीही अशीच भरारी घ्यावी...
.
आणि मांज्याने फक्त आधार द्यावा त्या स्वप्नांना..
.
.
जिच्या हाती पाळण्याची दोरी..’ हेच बोलत आलो अनेकवेळा भाषणातून..
.
.
आज नवं सुचलं,
.
.
जिच्या हाती पतंगाची दोरी,
तिच्या स्वप्नांची उंच भरारी



                 -विक्रम वागरे