बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

प्रवेशोत्सव....




आज शाळेचा पहिला दिवस.

गेली बारा वर्षे हा दिवस नित्यनेमाने माझ्या आयुष्यात येतोय.

पण बारा वर्षे झालीत म्हणून या दिवसाने आपलं नवेपण अजिबात गमावलेलं नाहीय.

उलट प्रत्येक वर्षी नवा आशावाद, नवी उमेद आणि नवी स्वप्नं घेऊन तो तितक्याच उत्साहाने भेटीला येतो.

यावर्षी मात्र तो या सगळ्यांसोबत वेगळी मजा आणि धमाल घेऊन आला.

दरवर्षी आमच्या शाळेत पहिलीच्या मुलांचं स्वागत अगदी उत्साहात होतं. याहीवर्षी हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करता येईल याची चर्चा गेले दोन दिवस सुरु होती. शेवटी बैलगाड्या सजवून त्यामधून मुलांना वाजतगाजत शाळेत आणायचं ठरवलं.

तेवढ्यात जिल्ह्याच्या शिक्षण सभापतींचा निरोप पोहोचला, ‘उद्याच्या प्रवेशोत्सवासाठी मी तुमच्या शाळेत उपस्थित राहतोय.’

मग काय, पुन्हा नव्याने कार्यक्रमाची उजळणी सुरु झाली.

बैलगाड्या तर सजवूच, पण वेगळं काही करता येईल का याचा विचार सुरु झाला आणि चर्चेतून एक भन्नाट कल्पना बाहेर पडली.

‘प्रवेशोत्सवासाठी रथ बोलावला तर...’

कोल्हापूरकर तसे जन्मतः हौशी. लग्नाच्या वरातीसाठी जीपला modify करून बनवलेला रथ बहुतेक करून असणारच. हाच सजवलेला रथ पहिलीच्या मुलांच्या स्वागतासाठी बोलवायचा ठरवलं. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला.

आज सकाळी पानाफुलांच्या तोरणांनी, रांगोळीच्या नक्षीने आणि मुलांच्या किलबिलाटाने शाळा सजली होतीच, पण खरी बहार आली ती शाळेच्या प्रांगणात आलेल्या रथाने! रथ पाहून मुलांनी तर हुर्यो करायला सुरुवात केली. झांज पथकातल्या झांजांचा खणखणाट वाढला, ढोल जोराने वाजू लागले आणि हा शिक्षणाचा रथ पहिलीच्या मुलांच्या दारात जावून त्यांना शाळेत येण्याचं निमंत्रण देवू लागला.

नुकताच पाऊस सुरु झाल्याने लोकांची शेतात जाण्यासाठी लगबग सुरु होती. पण हा रथोत्सवाचं अप्रूप पाहण्यासाठी सारा गाव लोटला. पोरांचं चाललेलं कौतुक पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचं हसू होतं. अचानक कुणाच्यातरी डोक्यात रथात बसलेल्या मुलांना फेटा बांधण्याची आयडिया आली आणि कोल्हापूरची शान असणारा फेटा त्या चिमुकल्या मुलांच्या डोक्यावर विराजमान झाला.

जिल्ह्याचे शिक्षण सभापती माननीय अभिजित तायशेटे हेदेखील या मिरवणुकीत सहभागी झाले. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळांना नवसंजीवनी देणाऱ्या या उमद्या माणसानं या रथाची स्वहस्ते पूजा केली आणि रथात बसलेल्या चिमुरड्यांना पेढेसाखर भरवली.

आणि रथात बसलेली ती चिमुकली पिल्लं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर अवर्णनीय होता. नवा गणवेश, दारात आलेला रथ, डोक्यावर बांधलेला फेटा, मिरवणुकीत सहभागी झालेला सारा गाव, झांज पथकाचा ठेका, फोटो काढण्यासाठी सरसावलेले मोबाइल आणि क्यामेरे घेऊन शूटिंग करणारे चाणालचे पत्रकार... एवढी मजा त्यांनी पहिल्यांदाच अनुभवली असावी. म्हणूनच की काय, बावरलेपण त्यांच्या चेहऱ्यावर शोधूनदेखील सापडत नव्हतं.

पहिलाच वर्गशिक्षक या भूमिकेतून त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहताना आनंदाबरोबरच एक जबाबदारीची भावनाही जाणवून गेली.

शिक्षणाच्या रथात बसून शाळेत आली ही पिलं, रथाच्या उधळलेल्या घोड्यांसारखी  त्यांच्या स्वप्नांनीही झेप घ्यायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचं...
.
.
त्यांच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हसू....
ते नेहमी जपायला हवं....


  -विक्रम वागरे



-          

धन्यवाद साहेब....



आज सकाळची नऊ सव्वानऊची वेळ.. 
शाळेला निघण्याची लगबग.
चिरंजीवाच्या प्रश्नांना उत्तरे देत आवराआवर सुरु.
तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
अशावेळी आलेला फोन म्हणजे दोरीवरून चालणाऱ्या पोरीच्या हातातून काठी निसटली तर काय होईल याचा प्रत्यक्ष अनुभव.
हेल्लो शक्य तितका तोल सावरत मी फोन उचलला.
विक्रम वागरे आहेत का? पलीकडून धीरगंभीर आणि कसलेला आवाज.
हो बोलतोय, आपण? माझा प्रतीप्रश्न.
मी इंद्रजीत देशमुख बोलतोय.
मी चक्क उडालोच.
 इंद्रजीत देशमुख म्हणजे शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक आणि युवा संस्कार शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुणाईला दिशा देणारं आणि संत साहित्याचा अभ्यासातलं लोकमान्य नाव.
त्यांचं व्याख्यान ऐकण्याचा एक-दोन वेळा योगही आला होता .
मनानं कधी निराशेचा सूर पकडला तर त्यांच्या व्याख्यानाच्या CD ऐकून उमेद मिळवणारा मी.
आणि आज त्यांचा प्रत्यक्ष फोन.
हे म्हणजे भक्ताला देव प्रसन्न झाल्यावर आकाशवाणी करत तसा अनुभव.
पण तरीही थोडा भांबावलोच.
कारण देशमुख साहेब सध्या आमच्या जिल्हा परिषदेचे Additional CEO आहेत..
बोला ना साहेब. मी दबक्या आवाजात बोललो.
तुमची कविता whatsaap वर वाचायला मिळाली. खूप आवडली मला
आता तर मला भोवळ यायची बाकी राहिली.
 धन्यवाद साहेब हे शब्द बाहेर पडायला देखील थोडा वेळ लागलाच.
मी ही कविता माझ्या आवाजात तुमच्याकडे पाठवतोय. एकदा ऐकून घ्या. मी इतरांशी शेयर केली तर चालेल ना?
माझ्या कवितेला साहेबांनी स्वतःचा धीरगंभीर आवाज देणं म्हणजे कृष्णानं सुदाम्याच्या मित्राच्या मित्राच्या मित्राचे पोहे खाणं.
चालेल ना साहेब मी अभावितपणे बोलून गेलो.
लगेच साहेबांनी Audio clip माझ्याकडे पाठवली. सोबत ‘इतरांना पाठवू का?’ असा परवानगीचा प्रश्नही.
.
आजचा दिवस खरंच खूप छान गेला.
.
.               
गोष्ट अजून बाकी आहे.
संध्याकाळी शाळेतून घरी परतताना पुन्हा साहेबांचा फोन.
तुमची कविता बऱ्याच जणांना पाठवली. खूप चांगले प्रतिसाद मिळताहेत. असेच लिहित राहा.
तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छांच पाठबळ असंच सोबत राहूदे सर, धन्यवाद
.
.
खरं तर यावेळचे ‘धन्यवाद’ साहेबांसोबत परमेश्वरासाठीही होते.
.
एका खूप मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी फोनवरून का होईना भेटवल्याबद्दल....


-विक्रम वागरे.

मला येईल का गोष्ट?




       हत्ती, पेन, नदी, ताई……..
       या चार शब्दांपासून गोष्ट तयार करता येईल?
       बरं आलीतर किती मोठी करता येईल?
       आणि याच शब्दांपासून किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार करता येतील?
       या सर्व प्रश्नांची अशक्यप्राय, कल्पनातीत उत्तरं काय असू शकतात याचा अनुभव घ्यायचाय?
       तर मग तुम्हाला कुमठे बीटच्या शाळांमध्ये जायला हवं.
       हा विलक्षण अनुभव मी काल प्रत्यक्षात घेतला.

 अवघ्या 26 पटाच्या शेरेवाडी शाळेतील 2री ची चिमुकली मुलं या चार शब्दांपासून तयार केलेली गोष्ट रंगवून, खुलवून इतक्या निरागसतेने सांगत होती, की ऐकणाऱ्या  प्रत्येकाला आपल्या कल्पनाशक्तीची कीव यावी.

राधानगरी तालुक्यातील विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख आणि निवडक शिक्षक मिळून कुमठे बीटला भेट देण्यासाठी पहाटे निघून 11 पर्यंत साताऱ्यात  पोहोचलो. आमच्या आधीच काही जिल्ह्यातील खूप सारे शिक्षक तिथे हजर होते. त्यांना मार्गस्थ करून प्रतिभाताईंनी आमचं स्मितहास्यानं स्वागत केलं. कुमठे बीटमधील शाळांचं सामान्यपण आणि वेगळेपण, दोन्ही सांगून काही महत्त्वाच्या सूचना (ज्या खरंच खूप महत्त्वाच्या होत्या) देऊन आम्हालाही मार्गस्थ केलं.

 शेरेवाडी शाळेत पोहोचल्यापासून तिथलं नाविन्य जाणवायला लागलं. मुलं निवांत गटात त्यांचं कार्य करत बसली होती. इतकी निवांत, की जणू खेळ मांडून बसावीततिथले धनवडे सर आणि बागल सरांनी आमचं स्वागत केलं आणि वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यांनी भरलेल्या त्या वर्गात मुलांच्याकडूनच आम्ही रचनावाद शिकायला सुरुवात केली.

पहिलीच्या मुलांची वाचन शिकण्याची चित्ररूप पद्धत, एका अक्षराने सुरू होणारे अनेक शब्द सांगून आपल्या भावविश्वातीलच त्या शब्दांचं वाचन, परिचित झालेल्या शब्दापासून वाक्ये बनवून त्यांचं वाचन या  साऱ्याच कल्पना भन्नाट! विशेष म्हणजे त्यांनी अजून लेखनाला सुरुवातच केलेली नाहीय!

चार शब्दांचा वापर करून दुसरीच्या मुलांनी सांगितलेल्या गोष्टी तर अफलातूनच! कुणाच्या हत्तीनं ताईकडून आपलं अंग रंगवून घेतलं, कुणाच्या हत्तीनं ताईकडून पेनानं आपलं चित्र काढ़ून घेतलं तर कुणाचा हत्ती नदीत मस्त डुंबला. इथं प्रत्येकाची गोष्ट वेगळी होती, मात्र प्रत्येक गोष्टीत आशय आणि आशावाद भरभरून होता

गणिताची गंमत तर न्यारीच! आईस्क्रीमच्या कांड्या, मण्यांची माळ, वेगवेगळ्या झाडांच्या बिया, आगपेटीतील काड्या, जुन्या पुस्तकांतील कापलेल्या संख्यांचे तुकडे, अशा मुलांनीच गोळा केलेल्या सहित्याचा वापर करून ती गणित शिकताहेत. संख्याज्ञान आणि चारही मुलभूत क्रिया प्रत्यक्ष कृती करून समजून घेताहेत, बेरीज-वजाबाकीची उदाहरणं स्वत: तयार करून सोडवताहेत. गणित इतक्या सोप्या पद्धतीनं शिकता येतं, हे त्या लहानग्यांनी आम्हाला शिकवलं. आणि सर्वात शेवटी त्यांनी हट्टानं पहायला लावलेलं लेझीमनृत्य! खरंच अप्रतिम!

असेच खूप सारे समृद्ध अनुभवांची शिदोरी घेऊन आणि गुरुजी मुलांचे आभार मानून संध्याकाळी चार वाजता सोनवडी शाळेत पोहोचलो तेव्हा प्रतिभाताईंनी सकाळच्याच उत्साहानं पुन्हा एकदा स्वागत केलं. आमचे अनुभव ऐकले आणि रचनावादासंबंधीच्या शंकांनाही उत्तरं दिली. त्यांचा निरोप घेऊन, काही पुस्तकं खरेदी करून गाडीत बसलो तेव्हा एकच प्रश्न मनात रूंजी घालत होता.
.
.
 हत्ती, पेन, नदी, ताई……..
या शब्दांपासून मला तयार करता येईल का,
एखादी छानसी गोष्ट?

-    विक्रम वागरे