हत्ती, पेन, नदी, ताई……..
या चार शब्दांपासून गोष्ट तयार करता येईल?
बरं आली, तर किती मोठी करता येईल?
आणि याच शब्दांपासून किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार करता येतील?
या सर्व प्रश्नांची अशक्यप्राय, कल्पनातीत उत्तरं काय असू शकतात याचा अनुभव घ्यायचाय?
तर मग तुम्हाला कुमठे बीटच्या शाळांमध्ये जायला हवं.
हा विलक्षण अनुभव मी काल प्रत्यक्षात घेतला.
अवघ्या 26 पटाच्या
शेरेवाडी शाळेतील 2री
ची चिमुकली मुलं या चार शब्दांपासून तयार केलेली गोष्ट रंगवून, खुलवून
इतक्या निरागसतेने सांगत होती, की
ऐकणाऱ्या प्रत्येकाला
आपल्या कल्पनाशक्तीची कीव यावी.
राधानगरी
तालुक्यातील विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख आणि निवडक शिक्षक मिळून कुमठे बीटला भेट देण्यासाठी पहाटे निघून 11 पर्यंत
साताऱ्यात पोहोचलो. आमच्या
आधीच काही जिल्ह्यातील खूप सारे शिक्षक तिथे हजर होते. त्यांना
मार्गस्थ करून प्रतिभाताईंनी आमचं स्मितहास्यानं स्वागत केलं. कुमठे
बीटमधील शाळांचं सामान्यपण आणि वेगळेपण, दोन्ही
सांगून व काही
महत्त्वाच्या सूचना (ज्या
खरंच खूप महत्त्वाच्या होत्या) देऊन
आम्हालाही मार्गस्थ केलं.
शेरेवाडी शाळेत पोहोचल्यापासून तिथलं नाविन्य जाणवायला लागलं. मुलं
निवांत गटात त्यांचं कार्य करत बसली होती. इतकी
निवांत, की
जणू खेळ मांडून बसावीत. तिथले धनवडे सर आणि बागल सरांनी आमचं स्वागत केलं आणि वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यांनी भरलेल्या त्या वर्गात मुलांच्याकडूनच आम्ही रचनावाद शिकायला सुरुवात केली.
पहिलीच्या
मुलांची वाचन शिकण्याची चित्ररूप पद्धत, एका
अक्षराने सुरू होणारे अनेक शब्द सांगून आपल्या भावविश्वातीलच त्या शब्दांचं वाचन, परिचित
झालेल्या शब्दापासून वाक्ये बनवून त्यांचं वाचन या साऱ्याच कल्पना भन्नाट! विशेष
म्हणजे त्यांनी अजून लेखनाला सुरुवातच केलेली नाहीय!
चार
शब्दांचा वापर करून दुसरीच्या मुलांनी सांगितलेल्या गोष्टी तर अफलातूनच! कुणाच्या
हत्तीनं ताईकडून आपलं अंग रंगवून घेतलं, कुणाच्या
हत्तीनं ताईकडून पेनानं आपलं चित्र काढ़ून घेतलं तर कुणाचा हत्ती नदीत मस्त डुंबला. इथं
प्रत्येकाची गोष्ट वेगळी होती, मात्र
प्रत्येक गोष्टीत आशय आणि आशावाद भरभरून होता!
गणिताची
गंमत तर न्यारीच! आईस्क्रीमच्या
कांड्या, मण्यांची
माळ, वेगवेगळ्या
झाडांच्या बिया, आगपेटीतील
काड्या, जुन्या
पुस्तकांतील कापलेल्या संख्यांचे तुकडे, अशा
मुलांनीच गोळा केलेल्या सहित्याचा वापर करून ती गणित शिकताहेत. संख्याज्ञान
आणि चारही मुलभूत क्रिया प्रत्यक्ष कृती करून समजून घेताहेत, बेरीज-वजाबाकीची उदाहरणं स्वत:च
तयार करून सोडवताहेत. गणित
इतक्या सोप्या पद्धतीनं शिकता येतं, हे
त्या लहानग्यांनी आम्हाला शिकवलं. आणि
सर्वात शेवटी त्यांनी हट्टानं पहायला लावलेलं लेझीमनृत्य! खरंच अप्रतिम!
असेच
खूप सारे समृद्ध अनुभवांची शिदोरी घेऊन आणि गुरुजी व मुलांचे
आभार मानून संध्याकाळी चार वाजता सोनवडी शाळेत पोहोचलो तेव्हा प्रतिभाताईंनी सकाळच्याच उत्साहानं पुन्हा एकदा स्वागत केलं. आमचे
अनुभव ऐकले आणि रचनावादासंबंधीच्या शंकांनाही उत्तरं दिली. त्यांचा
निरोप घेऊन, काही
पुस्तकं खरेदी करून गाडीत बसलो तेव्हा एकच प्रश्न मनात रूंजी घालत होता.
.
.
हत्ती, पेन, नदी, ताई……..
या
शब्दांपासून मला तयार करता येईल का,
एखादी
छानसी गोष्ट?
- विक्रम वागरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा