बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

प्रवेशोत्सव....




आज शाळेचा पहिला दिवस.

गेली बारा वर्षे हा दिवस नित्यनेमाने माझ्या आयुष्यात येतोय.

पण बारा वर्षे झालीत म्हणून या दिवसाने आपलं नवेपण अजिबात गमावलेलं नाहीय.

उलट प्रत्येक वर्षी नवा आशावाद, नवी उमेद आणि नवी स्वप्नं घेऊन तो तितक्याच उत्साहाने भेटीला येतो.

यावर्षी मात्र तो या सगळ्यांसोबत वेगळी मजा आणि धमाल घेऊन आला.

दरवर्षी आमच्या शाळेत पहिलीच्या मुलांचं स्वागत अगदी उत्साहात होतं. याहीवर्षी हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करता येईल याची चर्चा गेले दोन दिवस सुरु होती. शेवटी बैलगाड्या सजवून त्यामधून मुलांना वाजतगाजत शाळेत आणायचं ठरवलं.

तेवढ्यात जिल्ह्याच्या शिक्षण सभापतींचा निरोप पोहोचला, ‘उद्याच्या प्रवेशोत्सवासाठी मी तुमच्या शाळेत उपस्थित राहतोय.’

मग काय, पुन्हा नव्याने कार्यक्रमाची उजळणी सुरु झाली.

बैलगाड्या तर सजवूच, पण वेगळं काही करता येईल का याचा विचार सुरु झाला आणि चर्चेतून एक भन्नाट कल्पना बाहेर पडली.

‘प्रवेशोत्सवासाठी रथ बोलावला तर...’

कोल्हापूरकर तसे जन्मतः हौशी. लग्नाच्या वरातीसाठी जीपला modify करून बनवलेला रथ बहुतेक करून असणारच. हाच सजवलेला रथ पहिलीच्या मुलांच्या स्वागतासाठी बोलवायचा ठरवलं. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला.

आज सकाळी पानाफुलांच्या तोरणांनी, रांगोळीच्या नक्षीने आणि मुलांच्या किलबिलाटाने शाळा सजली होतीच, पण खरी बहार आली ती शाळेच्या प्रांगणात आलेल्या रथाने! रथ पाहून मुलांनी तर हुर्यो करायला सुरुवात केली. झांज पथकातल्या झांजांचा खणखणाट वाढला, ढोल जोराने वाजू लागले आणि हा शिक्षणाचा रथ पहिलीच्या मुलांच्या दारात जावून त्यांना शाळेत येण्याचं निमंत्रण देवू लागला.

नुकताच पाऊस सुरु झाल्याने लोकांची शेतात जाण्यासाठी लगबग सुरु होती. पण हा रथोत्सवाचं अप्रूप पाहण्यासाठी सारा गाव लोटला. पोरांचं चाललेलं कौतुक पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचं हसू होतं. अचानक कुणाच्यातरी डोक्यात रथात बसलेल्या मुलांना फेटा बांधण्याची आयडिया आली आणि कोल्हापूरची शान असणारा फेटा त्या चिमुकल्या मुलांच्या डोक्यावर विराजमान झाला.

जिल्ह्याचे शिक्षण सभापती माननीय अभिजित तायशेटे हेदेखील या मिरवणुकीत सहभागी झाले. गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळांना नवसंजीवनी देणाऱ्या या उमद्या माणसानं या रथाची स्वहस्ते पूजा केली आणि रथात बसलेल्या चिमुरड्यांना पेढेसाखर भरवली.

आणि रथात बसलेली ती चिमुकली पिल्लं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर अवर्णनीय होता. नवा गणवेश, दारात आलेला रथ, डोक्यावर बांधलेला फेटा, मिरवणुकीत सहभागी झालेला सारा गाव, झांज पथकाचा ठेका, फोटो काढण्यासाठी सरसावलेले मोबाइल आणि क्यामेरे घेऊन शूटिंग करणारे चाणालचे पत्रकार... एवढी मजा त्यांनी पहिल्यांदाच अनुभवली असावी. म्हणूनच की काय, बावरलेपण त्यांच्या चेहऱ्यावर शोधूनदेखील सापडत नव्हतं.

पहिलाच वर्गशिक्षक या भूमिकेतून त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहताना आनंदाबरोबरच एक जबाबदारीची भावनाही जाणवून गेली.

शिक्षणाच्या रथात बसून शाळेत आली ही पिलं, रथाच्या उधळलेल्या घोड्यांसारखी  त्यांच्या स्वप्नांनीही झेप घ्यायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचं...
.
.
त्यांच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हसू....
ते नेहमी जपायला हवं....


  -विक्रम वागरे



-          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा