दिनांक ०८/०२/२०१५
पंढरपूरच्या माघवारीहून आणलेल्या बॅडमिंटन
रॅकेटने मुलं शाळेच्या मैदानावर खेळत होती.
.
बॅडमिंटनच्या फुलासाठी वापरल्या जाणाऱ्या पिसांची, आणि त्याखातर मारल्या जाणाऱ्या पक्ष्यांची माहिती मुलांना द्यावी म्हणून त्यांच्याजवळ
जात मी ते फूल हातात घेतलं.
.
सुदैवानं ते फूल प्लास्टिकचं होतं.
.
थोडा वेळ त्यांच्यासोबत खेळून मी वर्गात परतलो; एक नवा खेळ मुले शिकत आहेत हा आनंद आणि चार दिवसात हा खेळ बंद पडणार ही रुखरुख
मनात घेऊन.
.
कारण त्यांच्याकडचं प्लास्टिकचं फूल लवकरच खराब होणार होतं.
आणि परिसरात ते मिळण्याची काहीच सोय नव्हती.
.
पण आठवड्यानंतरही त्यांचा खेळ बिनधास्त सुरु होता. विशेष म्हणजे एक रंगीत फूल रॅकेटवरून इकडेतिकडे उड्या मारताना दिसलं.
काय प्रकार आहे बघावं तरी, म्हणून जवळ जाऊन पाहिलं
आणि थक्कच झालो.
.
मुलं काटेसावरीच्या फुलांनी खेळत होती.
.
त्यांच्या सर्जनशीलतेला सलाम करत मी विचारलं, “ही आयडिया कशी काय सुचली रे?”
सहावीतला श्रीधर पुढे येत बोलला, “बघा ना सर, हे फूल पण त्या अगदी त्या
फुलासारखंच आहे. वर पसरलेल्या पाकळ्या आणि खाली एकदम जड.
प्लास्टिकच्या फुलापेक्षाही खूप मजा येते.”
.
मी खरंच खेळून बघितलं. खूप छान खेळता येतं
होतं त्यानं.
.
बालमानसशास्त्राचं कुठलंतरी पुस्तक वाचताना लक्षात राहिलेलं वाक्य मला आठवलं.
‘मुलांना खेळणी नव्हे; खेळ हवे असतात.
खेळ आवडला की खेळणी त्यांना आपोआप मिळत जातात.’
.
अगदी खरंय हे!!!
-विक्रम वागरे.
-विक्रम वागरे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा