दिनांक १५/०२/२०१५
काही दिवसांपूर्वी माझ्या पूर्वीच्या द्विशिक्षकी
शाळेत जाण्याचा योग आला. माझे सहकारी सोनवणे सर ( नंतर त्यांचीही तेथून बदली झाली.)
आणि माझा या शाळेशी खोल ऋणानुबंध आहे. दोघेही सहा
महिन्याच्या अंतराने नव्यानेच रुजू झालेलो. त्यामुळे जवळचे कुणीच
नसणाऱ्या नवपरिणीत जोडप्याने
एक एक गोष्ट जमा करत आपला संसार उभा करावा; तशी आम्ही ती शाळा
उभी केली होती. आमचं Second Home होतं ते!
.
परवा नव्याने शाळेत गेलो. षटकोनी दोन खोल्यांची ती
इमारत पुन्हा फिरून पाहिली. बऱ्याचश्या गोष्टी निसटत चालल्या
आहेत हे लक्षात आलं. पण भरतीनंतर ओहोटी हा निसर्गनियमच आहे ना?
.
फिरून बागेत आलो आणि दिमाखात उभ्या असणाऱ्या
झाडांना पाहून मात्र मनाला खूप समाधान वाटलं. इवली इवली रोपं. पाण्याचं दुर्भिक्ष्य
असतानाही मायेने जगवलेली. आता आभाळाशी स्पर्धा करू पाहणारी.
एक-दोन झाडांच्या अंगावरून हात फिरवताना काय मस्त
वाटलं! माझी नजर साऱ्या बागेवर भिरभिरली.
.
.
.
आणि काही तरी हरवल्याची जाणीव आत कुठेतरी
झाली.
.
नेमकं काय???
.
.
बरोबर! खिडकी जवळचं बेहड्याचं झाड कुठे गेलं??
.
मुलांना औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष ओळख व्हावी म्हणून बागेत औषधी
वनस्पती लावलेल्या. बेहड्याची दोन रोपं खूप लांबून आणून रुजवली
होती. त्यातलं एक शेळीनं खाऊन टाकलं. त्यामुळं
दुसऱ्याला खूप सांभाळलं होतं. बदली झाली त्यादिवशी भरल्या डोळ्यांनी
शाळेकडे मागे वळून पाहताना मुलांसोबत तेही निरोप द्यायला उभं होतं..
.
आता अचानक कुठे गेलं ?
.
“सर, इथलं बेहड्याचं झाड?” आता तिथे काम करणाऱ्या गुरुजींना
मी प्रश्न केला.
“ते ना, तोडलं की.” लिहिताना चुकलेलं अक्षर
खोडावं इतक्या सहजतेने त्यांनी माझा प्रश्न खोडून काढला.
“का पण?”
माझा आवाज थोडासा कातरलाच.
“खिडकीच्या आडवं येत होतं ते. वर्गात अंधार पडायचा.”
माझे तळपाय चटाचटा तापायला लागले. तरीही
डोक्यावर बर्फ ठेवत मी बोललो,
“फांद्या छाटायच्या ना मग त्याच्या? झाड का तोडलात?”
“सारख्या सारख्या फांद्या कोण छाटणार? म्हणून तोडलं.”
.
१००, ९९, ९८,...
मनातल्या मनात उलटे अंक मोजायला सुरुवात केली. तरीही मी माझ्या नियंत्रणात राहीन असं वाटेना. तोंड विटाळण्याअगोदर
तडक तिथून काढता पाय घेत मी गाडीवर मांड ठोकून सुटलो. आज पहिल्यांदा,
निघताना शाळेकडे मागे वळून पाहिलं नाही.
.
.
.
माझं बेहड्याचं झाड.....
माणसं सावलीसाठी झाडं लावतात..
तुला सावलीमुळं तुटावं लागलं....
-विक्रम वागरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा